उद्रेक न्युज वृत्त चंद्रपूर :- ब्रम्हपुरी तालुक्यात फिरत असलेल्या जंगली हत्तींने आता सिंदेवाही तालुक्यात आपला मोर्चा वळविला आहे.सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत मोरगाव बिटातील शेतशिवारात हत्तीने शेतपिकांचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. हत्तींचा बंदोबस्त करण्यास वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यात जंगली हत्तींनी प्रवेश केला होता.तालुक्यातील जंगल परिसरातील शेतशिवारात हत्तीचे वास्तव्य आढळून आले होते.त्यांचे पदमार्क आढळून आल्याने त्यांचे लोकेशन कळले होते.काही हत्ती गडचिरोलीच्या जंगलात परत गेले.त्यापैकी एका हत्ती त्यांच्यापासून वेगळा झाल्याने तो याच जंगलात भ्रमंती करीत असल्याचे दिसून आले.त्यानंतर तो हत्ती पुन्हा दिसेनासा झाला.त्यांने ब्रम्हपुरी वननरिक्षेत्राला लागून असलेल्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात एन्ट्री केली.
गुरूवारी सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी उपक्षेत्रातील मारेगाव बिटातील शेतशिवारात तो आढळून आला. शेतशिवारात भ्रमंती करून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे काही शेतकऱ्यांना दिसून आले.अरूण गुणशेट्टीवार यांचे गट क्रमांक १६८,२०२,२०३,२०४,२०५,२०६ मध्ये हत्तीने चांगलाच धुडगूस घातला.शेताला लावलेले तारेचे कंपाऊड तोडीत शेतात प्रवेश केला.शेतात सोयाबीन, मका व धानाची लागवड करण्यात आली आहे.या पिकांचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले.याच परिसरात हत्तीचे सध्या वास्तव्य असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.परंतु वनविभागाने त्या हत्तीच्या बंदोबस्त करण्याकरीता फारसे पाऊले उचल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे हत्तीचा हैदोस शेतशिवारात सुरूच आहे.
हत्तीच्या धुडगूसाने शेतकरी भयभित झाले आहेत. या परिसरातील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली आहे.सध्या पिके चांगली आहेत.त्यातच हत्तीचा धुडगूस सुरू असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वनविभागाने तातडीने सिंदेवाही तालुक्यात पिकांमध्ये धुडगूस घालणाऱ्या हत्तीचा बंदोबस्त करावा; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.