उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शासकीय सेवेत असलेला कर्मचारी मागील अनेक वर्षापासून गावात सर्रास दारूविक्री करीत आहे.यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाच्या अधीन जात असल्याचे चित्र बघून गावातील संतप्त महिलांनी स्वतः त्या व्यक्तीच्या घरी जाऊन पोलिसांना दारू पकडून दिली.मात्र, पोलिसांनी उलट याच महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल केले असल्याने जणूकाही चोरांच्या उलट्या बोंबा..! असे दिसून येत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील पोस्टमन म्हणून कार्यरत रघुनाथ कोटनाके हे सर्रासपणे दारूविक्री करीत आहे.यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाकडे वळत असल्याचा आरोप करीत स्वातंत्र्यदिनी संतप्त झालेल्या महिलांनी धावा पोलिस स्टेशन गाठत ठाणेदार गोरक्षनाथ नागलोट यांना आरोपी कोटनाके याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.मात्र पोलिसांनी आपण दारू पकड़ा आम्ही कारवाई करतो,असे सांगितले.त्यामुळे महिलांनी कोटनाके याच्या घराकडे मोर्चा वळवला.कोटनाके याने रोजंदारी करणारा व्यक्ती संतोष तुमराम याला राहण्यासाठी जे खोली आहे तिथे दारूच्या पेट्या आढळल्या.याची माहिती पोलिसांना दिली.दारूच्या शंभर बाटल्या तिथे सापडल्या; मात्र पोलिस पंचनामा न करता आरोपी संतोष तुमराम आणि रघुनाथ कोटनाके यांना घेऊन जात होते. यावेळी महिलांनी आक्षेप घेतल्यावर अखेर पंचनामा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांनी जबाबदार नागरिकांची भूमिका बजावली असताना आरोपीने खोटे आरोप करीत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी याच सामान्य २४ महिलांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, ४२७ अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली. पोलिस अधीक्षकांनी याकडे त्वरित लक्ष घालून याची चौकशी करण्याची मागणी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य सरस्वती आत्राम, माया आत्राम, माजी सरपंच उज्वला दुर्गे,मंगला कोकोडे,नलिनी कोटरंगे, सारिका कोटनाके, शिलिनी डोंगरे, वांदुशा सोनुले,कांता निवळकर, सुरेंद्र मांदाडे,ठाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक,रवींद्रसिंह परदेशी,चंद्रपूर 👇
महिलांनी दारू पकडून दिली ही बाब प्रोत्साहनपर असली, तरी त्यांनी कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीची धिंड काढणे चुकीचे होते.त्यानी तक्रार दिल्याने त्या महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तर महिलांच्या तक्रारीवरून त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलिस निरीक्षक,गोरक्षनाथ नागलोक,धाबा 👇
कायदा हा सर्वांसाठी समान आहे. महिलांनी त्याच्या घरात शिरून त्याला ओढत चौकात आणले, अशी तक्रार त्या व्यक्तीने केली आहे. त्यावरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तर महिलांनी केलेल्या तक्रारीवरून त्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. तपास सुरू आहे.