उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- खासगी फायनान्स कंपनीकडून मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज परत करण्यास उशीर झाल्याने फायनान्स कंपनीने चक्क कर्जदाराच्या घराला कुलूप ठोकले. सदर प्रकार मोहाडी तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासगी फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात, याची प्रचीती खडकी येथे आली.
खडकी येथील बाबू गणपत वहिले यांनी मुलीच्या लग्नासाठी व व्यवसाय करण्यासाठी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून पाच वर्षांपूर्वी तीन लाखांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय बुडाल्याने आहे.कर्ज थकीत झाले. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने महिंद्रा फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ही अत्यंत निष्ठुर कारवाई केली.कर्ज फेडण्यास आणखी मुदत देण्यात यावी, तसेच लावलेले कुलूप उघडण्यात यावे;अशी बाबू वहिले यांची विनंतीही धुडकावून लावण्यात आली.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घराला चक्क कुलूप ठोकून सील लावले.तसेच दरवाजावर नोटीस लावली.फायनान्स कंपन्या कर्ज देताना मोठे आमिष दाखवतात.मात्र कर्जाचा एक हप्ता थकला तरी घराला सील ठोकतात.याप्रकरणी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.