- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बनावट(बोगस)प्राथमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्याची माहिती समोर आली होती.नागपूर जिल्ह्यात जवळपास ५८० बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतनाची उचल करून शासनाला कोट्यवधीचा चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे. सदरचा प्रकार हा २०१९ पासून विविध शाळांमध्ये सुरू होता.
शालार्थ पोर्टलवर आढळलेल्या त्रुटींच्या आधारे तपासणी अंती,सदरची खळबळजनक बाब समोर आली होती.त्यानंतर शिक्षण विभागाकडून या सर्व शाळांची माहिती मागविण्यात आली.शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेत समिती तयार करून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.चौकशी अहवाल सादर केल्यानंतर आता कारवाईचा फास आवळला जात आहे.यात मोठे अधिकारीही गुंतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशातच विविध प्रकरणात शिक्षक किंवा संघटनांचे पदाधिकारी तक्रार करण्यास गेल्यावर, ‘माझे काका मुंबई मंत्रालयात उच्च पदस्थ अधिकारी आहेत,तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही,वाट्टेल तिथे तक्रारी करा’, अशी अरेरावीची भाषा वापरणारे नागपूर शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे.विविध शाळांमध्ये अपात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडीच्या आधारे वेतनास पात्र ठरवून शासनाची कोट्यवधीने फसवणूक करण्यात आल्याने शिक्षण उपसचिवांनी केलेल्या चौकशीच्या आधारावर वाघमारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करून पहिली कारवाई करण्यात आली असतांनाच आणखी एक धक्कादायक तितकाच आश्चर्यचकित करणारा प्रकार उघडकीस आला आहे.भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवताळा येथे मुख्याध्यापक पदावर असलेला पराग नानाजी पुडके हा नकली मुख्याध्यापक असल्याची बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे,मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसतांना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसतांना डायरेक्ट मुख्याध्यापक बनविण्यात आले.मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी.उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर नागपूर शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा,ता.लाखनी,जि.भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.या प्रकरणांमध्ये नागपूरच्या सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून ताब्यात घेतले आहे.प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके,रा.जेवताळा,ता. लाखनी,जि.भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.प्रकरणात आणखी काही बडे अधिकारी जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.एवढा मोठा स्कॅम तेही नागपूर सारख्या जिल्ह्यात उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
- Advertisement -