उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-आपल्या आजूबाजूला अशा काही चांगल्या घटना घडत असतात की ज्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मकता येऊ लागते.असाच एक आदर्शवत निर्णय आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी गावाने घेतला आहे. या गावाने पतीच्या निधनानंतर बांगड्या न फोडण्याचा ठरावच ग्रामसभेत मंजूर केला. याला प्रोत्साहन देण्यासाठी या गावतील महिलांनी २५ विधवा महिलांची खणा-नारळने ओटी भरून आदर्श निर्माण केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणाच या गावचे सरपंच स्वरुपा गावडे यांनी केली आहे.
समाजात विधवांबद्दलची बदलत चाललेली मानसिकता ही एका सकारात्मक विचारांची नांदी आहे. समाजातील विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी २५ विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. प्रजासत्ताक दिनी घेण्यात आलेल्या बांगड्या न फोडण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षानंतर कपाळावर हळद-कुंकू लाऊन मिळालेल्या सन्मानाने महिलांचा चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणीत करणारा होता. यापुढे संबंधित महिलांच्या हस्तेच अनेक शुभ कार्य करण्याचे देखील ठरवण्यात आले आहे. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सरपंच स्वरूपा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या ग्रामसभेला ग्रामसेविका दिपाली थोरात, उपसरपंच योगिता गावडे, मुख्याध्यापिका शशिकला चिखले, सदस्या मंदा गावडे, प्रियांका गावडे, मंगल गावडे, स्नेहल गावडे, ज्योती गायकवाड, मीना सोपानराव निघोट उपस्थित होत्या. या ऐतिहासिक निर्णयाने विधवा महिला तर भारावून गेल्याच पण समाजामध्ये देखील एक सकारात्मक निर्णय झाल्याची भावना पहायला मिळाली.