- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या-त्या गावातील मतदान केलेल्या ईव्हीएम मशीन मतदान पथकांनी परत आणून विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या स्थळी स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.आरमोरी विधानसभा मतदारसंघात देसाईगंज, कुरखेडा,कोरची व आरमोरी तालुक्यासह धानोरा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.अधिकाऱ्यांकडून येथील व्यवस्थेची पाहणी करून आढावा सुद्धा घेण्यात आला आहे. काल गुरुवारी अधिकाऱ्यांनी स्ट्राँग रूम परिसरात अनेक भेटी दिल्या.आरमोरी विधानसभा मतदारसंघातून मतदान पथकांनी ईव्हीएम देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरील वखार महामंडळाच्या कार्यालय परिसरातील गोदामात जमा केल्या असून मतदारसंघासाठी येथेच स्ट्राँग रूम तयार करण्यात आलेली आहे.स्ट्राँग रूमच्या सभोवताल पोलिसांचा खडा पहारा आहे.या भागातील परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आलेले आहे.ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम परिसरात सुरक्षेचा घेरा आहे.याशिवाय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.येथे जबाबदार अधिकाऱ्यांशिवाय इतरांना जाण्याची परवानगी नाही.ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी रेकॉर्डिंगचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे.कडेकोट सुरक्षेत मशीन ठेवलेल्या आहेत.विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याने या ठिकाणी विवक्षित सर्वच कृत्रींवर नजर ठेवली जात आहे.अशातच काल,गुरुवारच्या मध्यरात्री अंदाजे १२.३० ते १ वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असलेली एलईडी स्क्रीन अचानकपणे बंद पडल्याने स्क्रीनची पाहणी करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकच धांदल उडाली व ईव्हीएम मशीनी हॅक तर झाल्या नाही ना..! अशी रात्रीच चर्चा सुरू झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम, देसाईगंज शहरातील छत्रपती शिवाजी क्लबचे अध्यक्ष सागर वाढई,समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास खान पठाण व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.सदरची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास माहिती होताच लगेच आरमोरी मार्गावरील वखार महामंडळाच्या कार्यालय परिसरात जाऊन माहिती घेतली असता,तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की,सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असलेली एलईडी स्क्रीन काही तासांनी आपोआप बंद पडत असते,त्यामुळे तीला परत सुरू करावे लागते. अशातच एलईडी स्क्रीन बंद जरी पडली तरीही रेकॉर्डिंग ही सुरूच असते.त्यामुळे यात शंका
बाळगण्यासारखे काहीही नाही.अशी माहिती तेथील कर्मचाऱ्याने दिली.
- Advertisement -