उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- सचिनचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले. आज त्याचे वय ३० वर्षांचे आहे.विवाहित सचिन कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी गावातच चहा विकतो. सोबतीला पानठेलाही चालवितो.सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या या गुणी तरुणाने अडचणींवर मात करत चित्रपटनिर्मितीची आवड जोपासली. संभाजीनगर येथील वैभव पवार या मित्राशी संपर्क साधून त्याला आपली कल्पना सांगितली. त्याने कॅमेऱ्याच्या साहाय्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली. सचिनने स्वतःच पटकथा लेखक, संवाद लेखक आणि निर्मात्याची भूमिका बजावत ‘निर्दय’ या १२ मिनिटे २४ सेकंदांच्या लघुपटाची निर्मिती फक्त ६० हजार रुपयात केली.
जिद्द आणि सर्जनशीलतेचे हृदयस्पर्शी दर्शन दुर्बल कुटुंबातील सिपेवाडा (ता. लाखनी) या लहानशा गावातील सचिन शालीक कहालकर या चहा विकणाऱ्या तरुणाने कसलाही अनुभव नसताना चक्क लघुचित्रपट बनविला.एवढेच नाही तर प्रतिष्ठेच्या मराठा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन तिसरा अवॉर्डही मिळविला आहे.आपल्या गावच्या या तरुणाच्या कामगिरीचा गावाला आता अभिमान वाटत आहे.काहीतरी करण्याच्या ध्यासातून सचिनने ही कलाकृती निर्माण केली.
लघु चित्रपटासाठी त्याने पालंदूरजवळी गोंदी देवरी आणि साकोली येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसराची निवड शुटिंगसाठी केली.फक्त दोन दिवसांच्या शुटिंगमध्ये पॅकअप करून हा चित्रपट तयार केला. यासाठी कलावंतही आपल्या गावखेड्यातीलच निवडले.खरे तर एवढ्या खर्चाची ऐपत नव्हती.मात्र काही स्वत:जवळचे आणि मित्र व कुटुंबाच्या मदतीने ही रक्कम उभारून नवी ओळख निर्माण केली.१७ सप्टेंबरला मुंबईतील लता मंगेशकर फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या या लघुचित्रटाचे सादरीकरण झाले.प्रेक्षक आणि परीक्षकांना भुरळ पाडणारा त्यांचा लघुपट त्यांच्या कथाकौशल्याची आणि सिनेमॅटिक कौष्यल्याची साक्ष देतो.