उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर(सिंदेवाही) :- सिंदेवाही उपवन परिक्षेत्रातील मुरमाडी (कोठा) गावातील अंबादास चिरकुटा श्रीरामे यांच्या घरात बिबट्या शिरल्याचे ग्रामस्थांना दिसले. सुदैवाने अंबादास यांच्या भावाची पत्नी घराच्या समोरच्या खोलीत झोपली होती. बिबट्या घरात शिरला मात्र अंबादासच्या भावाची पत्नी झोपलेल्या खोलीत बिबट्या पोहोचू शकला नाही,म्हणून मोठी दुर्घटना टळली.
बिबट्या घरात शिरला तोपर्यंत घरातील सर्व लोक मिरची तोडण्यासाठी गावाबाहेर गेले होते. घर रिकामे असल्याने अंबादासच्या भावाची पत्नी रसिका त्या घराच्या समोरच्या खोलीत झोपली होती. अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान बिबट्या घरात शिरल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. त्याआधारे सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल साळकर,क्षेत्र सहायक दीपक हटवार,उसेंडी यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.यावेळी सिंदेवाही पोलिसही घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवत होते.घराच्या पाठीमागे शेत असल्याने हा बिबट्या त्या बाजूने आला असून घराचा मागील दरवाजा पूर्णपणे तुटल आहे. त्यामुळे याच दरवाजातून घरात प्रवेश केला असावा,असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ताडोबा येथून एक पथक (शूटर) पाचारण केले होते.बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी टीमने प्रथम घराच्या वरच्या भागावरून नेम घालण्याचा प्रयत्न केला.मात्र खोलीतील अंधार आणि नागरिकांची गर्दी यामुळे बिबट्यावर नेम घालणे शक्य झाले नाही.बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी शूटरच्या नाकीनऊ आले होते.मात्र काही वेळाने पथकाला यश मिळाले आणि बिबट पकडला गेला.