उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली(देसाईगंज) :- तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापूरामुळे देसाईगंज तालुक्यातील सर्व जन-जीवन विस्कळीत झाले होते.काहींची घरे उद्ध्वस्त झाली तर काहींची गायी,ढोरे,शेळ्या,बकरे वाहून गेलीत.त्याच बरोबर शेतकरी बांधवांची उभी असलेली पिके, शेतातील मोटार पंप व पाईप वाहून गेली.अशातच शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाच्या वीज तारा तुटून पडल्या व कृषी मीटर,डीपी पुराच्या पाण्याने जळून खाक झाली होती.असाच प्रकार देसाईगंज तालुक्यातील जुनी वडसा येथील शेतकरी बांधवांच्या बाबतीत घडला.त्यानुसार त्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस शेतात तुटून पडलेल्या तारा,बंद पडलेल्या डिपी व बंद असलेले कृषी पंपाचे वीज मीटर दुरुस्ती करण्याची मागणी केली.मात्र देसाईगंज विद्युत वितरण कंपनी कडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याने जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज आम आदमी पक्षाकडे धाव घेतली.धाव घेताच वितरण कंपनीस निवेदने सादर करून तुटलेल्या तारा व काही नवीन डीपी लावण्यात आले.मात्र शेतकरी बांधवांच्या शेतातील तुटलेल्या विजेच्या तारा बदलण्यासाठी पैसे घेण्यात आले आहे.एवढेच नाही तर डीपी आणण्याचे भाडेही त्यांच्याकडून घेण्यात आले असल्याचे जुनी वडसा येथील शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे.
सर्व काही करुनही अजून पावेतो कृषी मीटर बंद अवस्थेत आहेत.कृषी पंपाचे मीटर बंद असूनही भरमसाठ विद्युत बिल येत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.विजेचा वापर कमी व बिल जास्त येत असल्याने भली मोठी रक्कम आणावी कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी पाऊस दडी मारून बसतो,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी कर्जाचे डोंगर काळजाला भिडून जाते.सततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधव आत्महत्येचे पाऊल उचलतांना दिसून येतात.अशातच देसाईगंज विद्युत वितरण कंपनी अंगाला हळद लावीत नसल्याने अजूनही बरीचशी कृषी पंपाचे मीटर बंद अवस्थेत आहेत.त्यामुळे बिल भरमसाठ येतो; असे बिल भरणे न परवडणारे असल्याने जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी एकमत करून ज्याप्रमाणे विजेच्या तारा बदलण्यासाठी पैसे घेण्यात आले व डीपी आणण्याचे भाडे घेण्यात आले; त्याच प्रमाणे साहेब..! तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या….मात्र बंद पडलेले कृषी मीटर सुरू करा हो..अशी आर्त हाक जुनी वडसा येथील शेतकऱ्यांनी देसाईगंज विद्युत वितरण कंपनीस दिली आहे.

