- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतातील विहिरीत अडकलेली नादुरुस्त मोटार पंप क्रेनच्या साहाय्याने काढत असतांना क्रेनचा जवळच असलेल्या हायव्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श होऊन तब्बल चार जणांना विजेचा तीव्र धक्का बसल्याने बाप-लेकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडली.यात कासिम कोंडिबा फुलारी वय ५४ वर्षे,१६ वर्षीय मुलगा रतन कासिम फुलारी,शेत मजूर रामलिंग नागनाथ साखरे वय ३० वर्षे व नागनाथ साखरे वय ५५ वर्षे अशी मृतकांची नावे असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज शनिवारी केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतातील विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. विहिरीतील नादुरुस्त असलेली मोटार पंप बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली होती.
कामादरम्यान मोटार वर खेचतांना क्रेनचा लोखंडी भाग वरून जाणाऱ्या महावितरणच्या हायव्होल्टेज
(उच्च दाब)विद्युत वाहिन्यांना लागला.क्षणातच प्रचंड विद्युत प्रवाह क्रेनमधून खाली उतरला.त्यात,मोटार काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला.एकाच वेळी गावातील चार जणांचा असा मृत्यू झाल्याने केशेगावमध्ये शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतीकामातील सुरक्षिततेचा प्रश्न आणि शेतांमधून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
- Advertisement -

