उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-ग्रामीण भागात उन्हाळ्यात मग्रारोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात अकुशल कामे केली जातात.मजूर वर्ग आपल्या कुटुंबासह उन्हातान्हात घाम गाळूनही वेळेवर कामाची मजुरी उपलब्ध होत नाही.मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला कधी मिळणार? याकडे मजुरांचे लक्ष लागून आहे. आता अर्धा पावसाळा लोटूनही उन्हाळ्यात केलेल्या रोहयो कामाची मजुरी अद्याप मिळाली नसल्याने शासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आली.मात्र, जवळपास दोन महिन्यांपासून मजुरांच्या बचत खात्यात कामाचा मोबदला मजुरीच्या स्वरूपात जमा न झाल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांची आर्थिक कोंडी होत आहे.परिणामी,मजूर अडचणीत सापडले आहेत.या परिस्थितीत शासनाने मग्रारोहयोच्या अकुशल कामाची मजुरी तात्काळ बँक खात्यात जमा करावी; अशी मागणी महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांच्यासह मजूर वर्गाकडून केली जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गाव पातळीवरील विकासकामांना गती येते.या योजनेच्या माध्यमातून जाब कार्डधारक मजुरांना किमान शंभर दिवस काम देण्याची हमी दिली जाते व गावातील मजूर वर्गाला गावातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो.कामाचा मोबदला म्हणून नोंदणीकृत हजेरीपटावरील मजुरांची मजुरी त्यांच्या बचत खात्यावर जमा केली जाते.मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही केलेल्या कामाची मजुरी अजूनपर्यंत मिळाली नसल्याने मजूर वर्गात तीव्र रोष निर्माण झाला आहे.अशातच आता सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे मजूर असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे ‘इकडे आड व तिकडे विहीर’ असे झाल्याने पोटाची खळगी कशी भरावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मजूर असलेला शेतकरी वर्ग पिळला जातो आहे.केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग? मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला लवकरात-लवकर देण्यात यावा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिला आहे.

