उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सतत भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या सूचनेनुसार आज दिनांक – १ फेब्रुवारी रोजी देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध मान्यवर तसेच उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांच्या हस्ते आज दुपारच्या सुमारास तहसील कार्यालय परिसरात घंटा नाद आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन महिला तहसीलदार प्रीती डूडूलकर यांना सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यात युवा, विद्यार्थी,शेतकरी,बेरोजगार,महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.कापूस,सोयाबीन,कांदा, तूर या शेतमालाला भाव नाही,अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होऊनही विम्याची नुकसानभरपाई मिळत नाही.नोकरभरतीसाठी हजार- हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नित्याचीच बाब झाली आहे.यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे.राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत.कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे.अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या आंदोलनाकडे सरकार ढुंकूनही बघत नाही.दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत; पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही.

युवा हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचे प्रमाण ६० टक्के आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही.उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहेत.राज्यात ३२ लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी,पेपरफुटी, रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही सुटलेले नाहीत.विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च सरकारकडून दरवर्षी कमी-कमी केला जातोय. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाच्या ताटात भाकर देण्याचे काम देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा करतोय,पण त्याच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही.
आमदार रोहितदादा पवार यांनी पुणे ते नागूर अशी ८०० कि.मी.हून अधिक लांबची युवा संघर्ष यात्रा काढून राज्यातील या प्रश्नांकदे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.त्यामुळं कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि समूह शाळा योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली.परंतु अद्यापही अनेक प्रश्न शिल्लक आहेत पण सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही हालचाल करीत नाही.
असे अनेक प्रश्न आणि अडचणी लोकांना भेडसावत असूनही त्या सोडवण्याऐवजी सरकार जातीय वाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढे आणून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम करीत आहे.यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्त्वाला तडा जातोच पण राज्याच्या प्रगतीलाही खीळ बसत आहे आणि त्यात नुकसान मात्र सामान्य माणसाचेच होत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लक्ष वेधण्यात आले आहे.
तात्काळ पूर्ण करावयाच्या मागण्या👇
१) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी.दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना NDRF निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी.
२) राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
३) छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी.
४) अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व याआधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क परत करावे.
५) ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यांसारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तत्काळ सुरु कराव्यात. तसेच प्रलंबित असलेल्या सर्व नियुक्त्या तत्काळ देण्यात याव्यात.
६) राज्यात पेपरफुटीसंदर्भात राजस्थान, उत्तराखंडच्या धर्तीवर कडक कायदा करावा.
७) दत्तक शाळा योजना रद्द करावी.
८) महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायद्याची अंबलबजावणी करण्यात यावी.
९) नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण आणावे.
१०) विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची आणि महिलांसाठीची रखडलेली सर्व शासकीय वसतिगृहे तत्काळ सुरू करण्यात यावीत.
११) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजमाफी करण्यात यावी,
१२) खेळाडूंची रखडलेली थेट नियुक्ती देण्यात यावी.
१३) मराठा समाजाच्या आरक्षणातील संभ्रम दूर करुन धनगर, मुस्लीम व लिंगायत या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे वाढवण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
१४) अंगणवाडी सेविका, आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, संगणक परिचालक, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड अशा सर्व संघटनांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न तत्काळ सोडवावेत.
१५) सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थाना प्रत्येकी १००० कोटी देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे.
१६) विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्या त्वरित वितरीत करण्यात याव्यात.
१७) कापूस, कांदा, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांना चांगला दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यात यावे.
१८) खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य धोरण आणावे.
१९) प्रयोगशील शेतकरी प्रोत्साहन योजना राबवण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना नियमित व दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा.
२०) युवा पिढीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील ड्रग्सचे रॅकेट पूर्णपणे नष्ट करण्यात यावे.
२१) दुधाचे भाव पडले असून यातून दूध उत्पादकांचा खर्चही भरून येत नाही. त्यामुळे दुधाला भाव देण्यात यावा/अनुदान देण्यात यावे.
२२) आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व अडीच लाख पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु करावी.
अशा विविध मागण्यांचे निवेदन देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
विविध मागण्यांचे निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके,शहराध्यक्ष अशोक माडावार,अल्पसंख्याक अध्यक्ष साबू शेख,महिला शहराध्यक्ष नजमा पठाण,तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कपिल बोरकर,सत्यवान रामटेके, अविनाश राघोर्ते व शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

