उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-देशात २०१९ साली पार पाडण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीचे निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीत प्रचंड अनियमितता आढळून आली असुन छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही असाच घोळ निर्माण करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी सबळ पुराव्यासह वास्तविकता चव्हाट्यावर आणली आहे.ही बाब लोकशाहीसाठी अतिशय घातक असुन यामुळे संविधान धोक्यात येण्याची दाट शक्यता लक्षात घेता ईव्हीएम हटाओ आंदोलन समितीचा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकणार असुन दरम्यान ईव्हीएम हटाओ देश बचाओ संदर्भात निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणूक घेणे आवश्यक असताना व घेण्यात येत असलेल्या ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूकांवर प्रश्न चिन्ह लावल्या जात असताना जिल्ह्याच्या गावागावात ईव्हीएम संदर्भात जनजागृतीच्या गाड्या फिरविण्यात येत आहेत.विशेष म्हणजे सदर गाड्यांवर लावलेल्या बॅनरवर ईव्हीएमची विश्वासार्हता सांगितली जात असुन त्याचसोबत मोदी गॅरन्टी असल्याचे सांगीतले जात आहे.मा.नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असुन ते सर्वांचे पंतप्रधान आहेत.असे असले तरी निवडणूका घेण्याचा अधिकार त्यांना नसुन तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे.निवडणूक आयोग हे स्थिर संवैधानिक संस्था असुन देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात; यासाठी भारतीय राज्यघटनेने कायमस्वरुपी आणि स्वतंत्र संस्थेची स्थापना केली आहे.मात्र असे असताना व विकसित देशांनी देखील निवडणूका ईव्हीएम प्रभावित करु शकतात म्हणून वापर बंद केला आहे.सरकार कोणाचेही येवो मात्र निवडणूका निष्पक्ष होणे आवश्यक आहे.
घेण्यात येत असलेल्या निवडणुकांता ईव्हीएमचा वापर करण्यात येत असल्याने आपले मत कुणाला देतो याबाबत संशय आहे.ईव्हीएम मशिनला जोडल्या गेलेली व्हिव्हिपॅट मशिन ७ सेकंद पर्यंत दिलेल्या मताचे चिन्ह दाखवित असले तरी व्हिव्हिपॅट मधून दिसणाऱ्या मतपत्रिकेची संशयास्पद स्थितीत मतमोजणी केली जात नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्हिव्हिपॅटच्या मतपत्रिका एक वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवणे आवश्यक असताना व संशयास्पद स्थितीत मतपत्रिकेचीच मोजणी करणे अनिवार्य असताना तसे केले जात नाही. यावरून लोकाधिकार संपुष्टात येऊन एकाधिकारशाही निर्माण झाल्यास संविधानाने दिलेले अधिकार संपुष्टात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.करीता निवडणूका निष्पक्ष घेण्यासाठी ईव्हीएम हटाओ,देश बचाओ अंतग॔त समितीच्या वतिने देसाईगंज येथील फव्वारा चौकापासून जनआक्रोश मोर्चाची सुरुवात करुन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवडणूक आयुक्तांना येत्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरनेच घेण्या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.आयोजित मोर्चात जास्तीत जास्त संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

