उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- १० मार्च ते ६ जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून,गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज,मंगळवारी जाहीर होणार आहे.आज, ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून,पोलिसांनी खबरदारीचा इशारा म्हणून, व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून सामाजिक सौदार्य टिकविण्याच्या दृष्टीने व्हॉट्सॲप ग्रुप ‘ओन्ली फॉर ॲडमिन’ करावे; असे आवाहन करताच काल,सोमवारी ३ जून रोजी अनेक ग्रुपचे सेटिंग बदलून ‘ओन्ली फॉर ॲडमिन’ झाल्याचे बघायला मिळाले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हॉट्सॲप ग्रुप व इतर तत्सम अप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या,धर्माच्या भावना दुखावतील,अशा स्वरुपाच्या पोस्ट,कॉमेंट्स,स्टोरी,स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार माध्यमाद्वारे करू नयेत.तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये;डीजे वाजवणार नाहीत,फटाके फोडणार नाहीत.तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये; तसेच व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन यांनी ३ ते ६ जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ‘ओन्ली ॲडमिन’ करून बदल करून घ्यावा.जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही.
ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत देसाईगंज ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी आवाहन करताच काल,३ जून रोजी सोमवारी याचा परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला.

