उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- उपराजधानीत नवीन वर्षात गुन्ह्यांचा दर कमी होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती.मात्र, प्रत्यक्षात २०२३ च्या तुलनेत या वर्षी गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.मागील वर्षी दर महिन्याला सरासरी ८३३ गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते.यंदा हा आकडा सरासरी ८४४ वर गेला आहे.२०२१ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हा सर्वाधिक आकडा आहे.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे शहरातील गंभीर गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. २०२१ पासून ते मार्च २०२४ या कालावधीत नागपुरात किती गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले, हत्या अत्याचार-विनयभंग-फसवणूक यांचे
प्रमाण किती होते याबाबत त्यांनी विचारणा केली होती.प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपुरात जानेवारी ते मार्च या कालावधीत २ हजार ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली.याची सरासरी महिन्याला ८३३ इतकी होत आहे.२०२३ मध्ये संपूर्ण वर्षभरात ९ हजार ९९९ गुन्हे नोंदविल्या गेले होते.तर, २०२१ मध्ये ८ हजार २३२ व २०२२ मध्ये ७ हजार ७९६ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
मागील काही काळापासून नागपुरात हत्यांच्या प्रकरणांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.जानेवारी ते मार्च या कालावधीत नागपुरात २० हत्यांची नोंद झाली.२०२३ मध्ये पूर्ण वर्षभरात ७९ हत्या झाल्या होत्या.

