उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- धार्मिक एकता ट्रस्टच्यावतीने कर्जमुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यात फायनांन्स कंपन्यांच्या बळजबरीपणामुळे अनेक जण त्रस्त आहेत.अवैध सावकारीचा विळखा बसला आहे.यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.गुन्हे दाखल करण्यात यावे; या मागणीसाठी काल,५ मार्चपासून अजयकुमार भारतीय यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
फायनान्स कंपनी व त्यांचे एजंट तसेच विना लायसन्स सावकारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. सुप्रिम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कर्जमुक्तीचे कार्डधारकांना व्याज न आकारता वेळ देण्यात यावा, ज्या पतसंस्था, फायनान्स कंपन्या व सावकार जाणीवपूर्वक चेक बाऊंस करून १३८ ची केस बनवितात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कर्जदाराची संपत्ती जबरन हिसकावून घेण्यास कारणीभूत ठरणारा सरफेसी ॲक्ट २००२ मध्ये बदल करण्यात यावा; आदी प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत.
उपोषणस्थळी राजेश इंगोले, राजेश शेवलकर, वीरेंद्र कहालकर, रिता भोयर, रवी बर्वे, येशुदास चौबे, धनराज चाचेरे, दीप्ती मानापुरे, बैजलाल येळेकर, रतनघोष बारई, चंद्रकुमार पडारे, रतन मने, कुंभराज पटले, पदमाकर पंधरे व अन्य नागरिक उपस्थित होते.

