उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- केंद्र सरकारचे अंतरिम बजेट १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील.खरे तर,अर्थमंत्री संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार नसून, कामकाजाचा लेखाजोखा तेवढा मांडतील आणि सरकारच्या उर्वरित कालावधीकरिता खर्चासाठी संसदेची मंजुरी घेतील, याला अंतरिम बजेट असे म्हणतात.देशाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाच्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा.पैसा कोठून येणार आणि सरकार तो कुठे व कसा खर्च करणार याचा हा एक आराखडा असतो.वार्षिक आर्थिक विवरण असेही त्याला म्हणतात.अंतरिम अर्थसंकल्प मात्र सध्याच्या सरकारला नवीन सरकार येईपर्यंत आणि पूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत देश चालवण्यासाठी पैसे पुरवतो.निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा माजी अर्थमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी त्या करणार आहेत. सीतारामन यांनी सलग ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत.सहाव्यांदा त्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील आणि माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग,अरुण जेटली,पी.चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांनाही सीतारामन मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते.मोरारजीभाई देसाई यांनी १९५९-१९६४ दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.पुढेही देसाई अर्थमंत्री झाले होते आणि त्यांच्या नावावर सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही आहे.

