उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-आपला परिसर ग्रामीण भागात मोडत असुन न्यायालयात धाव घेणारे अनेक अन्यायग्रस्त गोरगरीब अज्ञानी असतात; अशा लोकांना न्यायदानाची भाषा समजुन घेताना त्यांच्या स्थानिक बोली भाषेत असणे आवश्यक असुन प्रचलित भाषा मराठी असल्याने न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केल्यास पक्षकारांची पिळवणूक थांबेल; करीता मराठी भाषेचा वापर करून समृद्ध करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए.बी.मडके यांनी केले.
ते देसाईगंज न्यायालयाच्या सभागृहात तालुका विधी सेवा समिती देसाईगंज तथा अधिवक्ता संघ देसाईगंज यांचे संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन व कार्यालयीन कामातील उपयोग या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.सुभाष उपाते,जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु,प्रा.दिलीप कहुरके,प्रा.गेडाम,सरकारी अधिवक्ता संजय हटकर,ॲड.चोपकार,ॲड.लाँगमार्च खोब्रागडे,ॲड.दत्तु पिलारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रमाचे औचित्य साधून जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु मार्गदर्शन करताना म्हणाले की मराठी भाषेची व्याप्ती फार मोठी असुन परिसरातील नागरीकांची जादातर बोली भाषा मराठी असल्याने समजण्यास, बोलण्यास सोपी जाते.त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया समजून घेण्यास सोपे जात असल्याने समज,गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकते करीता न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर अती आवश्यक असुन लोकहितार्थ असल्याचे सांगीतले.कार्यक्रमाचे संचालन ॲड. ज्युईली मेश्राम यांनी प्रास्ताविक ॲड.दत्ता पिलारे तर आभार ॲड.लाँगमार्च खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अधिक्षक कुकुडकर, भागवतकर,गावंडे, चेतन भुर्रे आदिंनी सहकार्य केले.

