संपादकीय
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- पूर्वी मानवी जीवनात अन्न,वस्त्र आणि निवारा अशा तीन प्रकारच्या मूलभूत गरजा होत्या.मात्र त्यात काळानुरूप बदल होऊन काही गरजा आवश्यक झाल्या आहेत.त्यामध्ये मुख्यत्वे; शिक्षण,आरोग्य,करमणूक तसेच व्यवसाय या प्रमुख गरजांची प्रामुख्याने भर पडली आहे.त्यानुसार अनेकजण आपापल्या परीने कार्य करून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.अशातच व्यवसाय वा इतर कामे पूर्ण करून ज्यांचा आसरा घेतात; असे कामगार बंधूच नसते तर….! सर्वांची पुंगी वाजली असती.
आजचे युग हे स्पर्धेचे व तंत्रज्ञानाचे असले तरीही मानवी जीवनाचे मूल्य कमी झाले नाही.सध्याच्या घडीला कितीही यंत्रांच्या सहाय्याने कामे करण्यात येत असली तरीही; अशी यंत्रे चालविण्यासाठी कामगार बंधूंची गरज भासते.काळानुरूप बदल झाल्याने अनेक ठिकाणी कामे करण्यासाठी कामगार वा मजुर वर्ग मिळणे कठीण झाले आहे.अशातही काहीजण काम करण्यास धजवणाऱ्या बंधूंना तुच्छ लेखून गरिबीचा फायदा घेतांना दिसून येतात.मात्र अशा द्विभाषिक व्यक्तींना कामगारच मिळाले नाही तर अशांची अवस्था ‘ना घर के ना घाट के’ अशी झाल्याशिवाय राहणार नाही.आपण नेहमीच बघत असतो की,घर बांधकाम,रस्ते बांधकाम,नाली बांधकाम व इतर बांधकामे तसेच रोजंदारीवर कामे करण्यासाठी मजुर तसेच कामगार बंधूंची आवश्यकता असते.अशी कामे करण्यासाठी कामगार वा मजुर तयार झालेच नाही; तर ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था एक ना एक दिवस निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.तरीही काहीजण पैश्याचा माज दाखवीत असतात.अशांसाठी केवळ पैसा महत्वाचा असतो.मात्र गोर गरीबांसाठी प्रेमाचे दोन शब्दच महत्वाचे असतात.मात्र अनेकांना त्याची जाणीव नसते.अनेक कामे ही केवळ पैस्यानेच होत नसतात.हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आजच्या आधुनिक काळात सर्वच जण आपापल्या पद्धतीने बरोबरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यात काहीजण यशस्वी होतात; तर काहीजण निष्फळ ठरतात.त्यामुळे कुणालाही तुच्छ लेखू नये; तसेच कमजोर समजू नये; कोण ?कधी व केव्हा? बाजी मारून आपल्या समोर निघून जाईल याचा काही नेम नाही.

