उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- बिअर बारच्या परवान्याची फाइल मंजूर करण्याच्या बदल्यात ३.२५ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक रवींद्र कोकरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी कोकरेच्या घराची झडती घेतली असता,तेथून ६६ हजारांची दारू जप्त करण्यात आली.या प्रकरणात देखील कोकरेविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमेश्वर येथील रेस्टॉरंट चालकाकडून रवींद्र कोकरे ३.२५ लाखांची लाच घेताना कोकरेला ‘एसीबी’च्या पथकाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. कोकरेने चार लाख रुपये मागितले होते व त्यानंतर सव्वातीन लाखांत काम करण्यास तो तयार झाला होता.
कोकरे मुळचा पुण्याचा असून ट्रॅफिक पार्कजवळच त्याचे निवास आहे. कोकरेला रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली.तेथे ब्रँडेड दारूच्या ३० बाटल्या सापडल्या.याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली त्याआधारे कोकरेविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कोकरेने अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.ही मालमत्ता विश्वासू लोकांच्या नावावर आहे.’एसीबी’ कोकरेच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून सत्य शोधत आहे.३.२५ लाख रुपयांच्या लाचेत उत्पादन शुल्क विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांचाही वाटा होता का? याची चौकशी सुरू आहे.

