उद्रेक न्युज वृत्त
चिमूर(चंद्रपूर) :- दागिने स्वच्छ करून देण्याच्या नावाखाली एका वृद्ध महिलेकडून २० हजारांची सोन्याची पोत केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सकाळी दहा वाजता घडली.पीडितेच्या तक्रारीवरून चिमूर पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
शहरातील नेताजी वॉर्ड येथील मंदा दादाजी साखरकर ही वृद्ध महिला सकाळी एकटीच खाटेवर चहा पीत बसली होती.त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती घरी आला व दागिने साफ करून देतो म्हणून गळ्यातील सोन्याची पोत मागितली.त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने दागिने दिले.चोरट्याने त्याच्याकडील बॅगमधील पावडरचे पॉकेट काढून त्यामध्ये सोन्याची पोत टाकली.तेवढ्यात त्याचा साथीदार आला व त्याने कागदातील प्लास्टिक पिशवी महिलेच्या हातात देऊन ही पिशवी अर्ध्या तासाने उघडा म्हणून सांगितले आणि पोबारा केला.काही वेळाने पिशवी उघडली असता त्यात सोन्याची पोत नसल्याचे उघडकीस आले.या घटनेची माहिती तिने कुटुंबीयांना दिल्यानंतर चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

