उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शहरासोबत ग्रामीण भागातही हॉटेल,चहा टपऱ्या, रेस्टॉरंट आदी ठिकाणी तसेच वाहनांत सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहेत.विशेष म्हणजे रहदारीच्या ठिकाणी उघड्यावर सिलिंडर वापरले जात आहेत. त्यामुळे अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेकडून कारवाई होण्याची गरज आहे.परंतु,धाडसी कारवाया होत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली शहरातील बाजार,महामार्ग परिसर, बसस्थानकासमोरील परिसरात काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करतात.गॅस वापरताना त्यांच्याकडून फारसी सुरक्षितता बाळगली जात नाही.त्यामुळे धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.काही वाहनांमध्येही अनधिकृतपणे सिलिंडर वापरले जाते.अनधिकृत सिलिंडर विक्रीही केली जात आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी शासनाच्यावतीने सवलती दिल्या जातात.त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी असतात.त्याचाच गैरफायदा व्यावसायिकांकडून घेतला जात आहे.पुरवठा विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.परंतु, कारवाई होत नसल्याने त्यांचे फावत आहे.व्यावसायिक खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत.

