उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):– गेल्या अनेक दिवसांपासून धानोरा तालुक्यात भ्रमंती केल्यानंतर जंगली हत्तींचा कळप कुरखेडा तालुक्याकडे वळला आहे.कुरखेडा तालुक्यातील गंगसायटोला परिसरात हत्तींनी तळ ठोकला होता.आता हत्तींचा कळप येथून भ्रमंती करीत कुमुडपार जंगलात पोहोचला आहे. त्यामुळे परिसरात हत्तींची दहशत निर्माण झाली आहे.कुरखेडा तालुक्यात हत्तींच्या आगमनाने शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप जिल्ह्यातील धानोरा,कुरखेडा, देसाईगंज,आरमोरी,गडचिरोली तालुक्यातील जंगलात भ्रमंती करीत आहे.काही दिवसांपूर्वी हा कळप नजीकच्या गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील दाखल झाला होता. तेव्हापासून जिल्ह्याच्या विविध भागात रानटी हत्ती ठाण मांडून आहेत.अलीकडेच कुरखेडा तालुक्यातून हत्तींचा कळप धानोरा तालुक्यात छत्तीसगड सीमेवर पोहोचला होता.त्यामुळे कळप पुन्हा छत्तीसगड राज्यात जाईल,अशी अपेक्षा होती.मात्र,धानोरा तालुक्यातील जंगल परिसरात काही काळ वास्तव्य केल्यानंतर कळपाने पुन्हा कुरखेडाचा रस्ता धरला आहे.नुकतेच कळपाने तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गंगसायटोला येथे प्रवेश केला.आता पुढे हा कळप कुमुडपार जंगल परिसरात पोहोचला आहे.

