उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सुखदेव विठोबा मते असे अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याचे नाव असून,त्यांनी काल,रविवारी दिनांक – १४ जुलै ला वरठी पोलिस ठाण्यात ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हनुमान वॉर्ड,वरठी निवासी सुखदेव विठोबा मते हे वरठी ग्रामपंचायतमध्ये २ वर्ष नियमित कर्मचारी म्हणून नाली सफाई आणि पाईपलाईनचे काम करीत होते.३० ऑक्टोबर २०२३ रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवेत असताना त्यांच्या पगारातून १०९० रुपये कपात होत होते.तर तेवढीच रक्कम ग्रामपंचायतच्यावतीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत होती. याशिवाय भविष्य निर्वाह निधीची रक्कम अधिक मिळावी,या हेतुने सुखदेव त्यांच्या पगारातून अतिरिक्त १०० रुपये कपात केले जात होते.सन २०२० ते २२ असे दोन वर्ष मते यांच्या पगारातून दरमहा एकूण ३१८० रुपये कपात होत होती.ही सर्व रक्कम ग्रामपंचायत सचिव तथा ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याकडे जमा राहत होती.८ महिन्यांपूर्वी सुखदेव मते सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्त झाल्यानंतर सुखदेव त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेची मागणी ग्रामपंचायतकडे केली.जुलै २०२१ ते ऑक्टोबर २०२३ अशा १५ महिन्याचे ८९ हजार ४० रुपये अफरातफर करून ग्रामसेवक दिगंबर गभणे यांनी त्याच्या खिश्यात घातले असल्याचा आरोप मते यांनी केला आहे.गभने यांनी ही रक्कम कोणत्या शासकीय कामात खर्च केली किंवा वैयक्तिक लाभासाठी,याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे मते यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वाऱ्या केल्या. मात्र,८ महिने लोटूनही त्यांना त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नव्हती.अखेर त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आले.त्यांना पगारातून कपात होत असलेल्या भविष्य निर्वाह निधीवर ग्रामसेवकाने डल्ला मारल्याचे त्यांना कळले.ग्रामसेवक दिगंबर गभने यांनी २०२१ ते २२ या वर्षभरातील मते यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलीच नसल्याची माहिती त्यांना मिळाली.

