उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यातील ३ नागरिकांचा बळी घेणारा वाघ जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश मिळाले आहे.आज,१८ मे रोजी अखेर हा वाघ जाळ्यात अडकला.खडसंगी बफर परिक्षेत्रातील निमढेला येथे या वाघाने धुमाकूळ घातलेला होता.सदर वाघ हा भानुसखिंडी वाघिणीचा बछडा होता.
बेंबळा येथील सूर्यभान हजारे,नीमढेला येथील रामभाऊ हनवते व खाणगाव चिमूर तालुक्यातील अंकुश खोब्रागडे या तिघांचा या वाघाने बळी घेतला होता.त्यामुळे सदर वाघास ठार केले जावे; अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात होती. वनविभागाच्या वतीने देखील सदर वाघास जेरबंद करण्यासाठी जाळे लावण्यात आले होते.
आज, दिनांक-१८ मे रोजी सकाळी ११ वाजता खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र नीमढेला मधील कक्ष क्रमांक- ५९ मध्ये भानुसखिंडी वाघाच्या बछड्याला रेस्क्यू ऑपरेशन करीत पकडण्यात आले.या मोहिमेच्या यशस्वितेसाठी किरण धानकुटे (वन परिक्षेत्र अधिकारी), डॉ. खोब्रागडे, पोलिस नाईक शूटर एसी मराठे, राकेश आहुजा यांनी केली. पकडण्यात आलेल्या वाघाची प्रकृती बरी असल्याने त्याला गोरेवाडा येथे नेण्यात आले.

