उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरात पुरुषोत्तम पुट्टेवार हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणात आता नवी धक्कादायक माहिती समोर येत आहे.या प्रकणात काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे नाव पुढे आले आहे.सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या अर्चना पुट्टेवार आणि प्रशांत पार्लेवर यांना या कटात एका काँग्रेस नेत्याने मदत केल्याचा संशय आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज येथील एक काँग्रेस नेता या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती आहे.हा नेता या प्रकरणात पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे; असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसारित केले आहे.
२२ मे रोजी नागपूरच्या मानेवाडा चौकाजवळ पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता.सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.कोट्यवधींचे मालक असेलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला,मुलगा डॉ.मनीष,सून अर्चना आणि मुलगी योगिता आहे.अर्चना पुट्टेवार या गडचिरोली नगर रचना विभागाच्या सहायक संचालक होत्या.तर तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार हा सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक आहे.या दोघांनी कट रचून सुपारी देत पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

आता या प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचे नाव समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,काँग्रेसच्या या नेत्याला गडचिरोलीतील बलाढ्य पट्टा हवा होता.तर अर्चनाला प्रमोशनसह चांगल्या जागी बदली हवी होती.त्यामुळे हे दोघे एकत्र आल्याची माहिती आहे.आता हा नेता हे प्ररकण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे ‘तो’ नेता कोण? अशा चर्चेला उधाण आले आहे.