संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला ग्रामीण भागातील अनेक घरकुल लाभार्थ्यांची घरे मंजूर होऊन बांधकामे सुरू करण्यात आली आहेत.अशातच मोठ्या प्रमाणावर रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीविना बांधकाम पूर्ण करावे कसे?असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांच्या मनात घर करुन सोडत असल्याने ‘साहेब रेती मिळेल कां रेती’?..अशी आर्त हाक ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
शासन स्तरावरून रेती बाबत अनेक धोरणे आखली जात असली तरीही त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब लागत असल्याने अनेकांना रेतीचा तुटवडा जाणवत आहे.पुढील काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने घरकुलांची बांधकामे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत.बांधकामे ठप्प स्वरूपात असल्यास पंचायत विभागातर्फे नोटीसा बजावल्या जातात.मात्र हल्ली रेती नसल्याने यांवर तोडगा काढण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.काही घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यांवर बांधकामाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.तसेच काही घरकुल लाभार्थ्यांनी विटा,सिमेंट,लोहा व इतर साहित्य खरेदी करून ठेवली आहेत.मात्र रेती अभावी बांधकाम सुरू होणार कधी? असा गहण प्रश्न लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.
काही लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाले म्हणून जुने घर पाडून नवीन बांधकाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे.पावसाने थैमान घातल्यास रहावे कुठे? अशी अवस्था सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांची झाली आहे.त्यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेतीसह रेती घाटांची लिलाव प्रक्रिया ताबडतोब सुरू करुन; घरकुल लाभार्थ्यांना दिलासा द्यावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.