उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- सध्याच्या घडीला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काही प्रमाणातील रेती घाट सोडले तर उर्वरित बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.रेती तस्करी करून चढ्या दराने खुलेआम विक्री करतांना रेती चोरटे सर्वत्र दिसून येत आहेत. अशातच काल १५ मार्च २०२३ रोजी रात्रोच्या सुमारास देसाईगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी वर्ग गस्तीवर असतांना अवैधरीत्या रेतीचे ट्रॅक्टर विसोरा येथे वाहतूक करतांना पोलिसांच्या निदर्शनास आले असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच विना नंबर ट्रॉली ट्रॅक्टरचा पाठलाग केला.मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर पळवून लावित गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.
चोर कितीही गुंगारा देण्याचा प्रयत्न करेल; मात्र पोलीस प्रशासनाच्या तावडीतून सुटणे अशक्य असल्याची खरी प्रचिती भरधाव वेगाने नेणाऱ्या रेती तस्कारास कळले असेलच; अखेर गस्तीवर असणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी गुंगारा देणाऱ्या रेती तस्काराचा रात्रोच्या सुमारासच शोध घेऊन रेती भरलेला ट्रॅक्टर देसाईगंज पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.सदर रेती भरलेला ट्रॅक्टर शंकरपुर येथील विनोद बुद्धे यांच्या मालकीचा आहे.जमा करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत देसाईगंज तहसील कार्यालयास पत्रव्यवहार करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचे देसाईगंज पोलीस प्रशासनाने कळविले आहे.