- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडलेला दिसून येतो.महत्वाचे म्हणजे,एकदा सुरू झालेली योजना बंद पाडण्यासाठी सरकारला मोठ्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसारख्या योजना बंद करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे.विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार हलका करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षापासून या दोन्ही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ९० हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार आहे. याशिवाय,विविध लोकप्रिय योजनांचाही ताण असल्याने राज्य शासनासमोर तब्बल दोन लाख कोटी रुपयांची तूट उभी असून,आर्थिक गाडा सावरण्यासाठी किमान एक लाख कोटींपर्यंतची तूट भरून काढण्याचे आव्हान अर्थ खात्यासमोर आहे.त्यातच,विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रूपयांवरून २१०० करण्याचे आव्हान बाकीच आहे.ही वचनपूर्ती न केल्यास विरोधकांकडून त्याचे राजकीय भांडवल केले जाण्याचा धोका असल्याने लाडक्या बहिणींसाठी गरिबांच्या शिवभोजन थाळी,आनंदाचा शिधा अशा योजना बंद करता येतील का? याची चाचपणी अर्थ खात्याकडून केली जात आहे.
- Advertisement -

