उद्रेक न्युज
गडचिरोली :- गडचिरोली येथील आदिवासी संस्कृती समृद्ध आहे आणि तिचा अभिमान बाळगत मिळालेल्या संधीतून युवकांनी आपल्या संस्कृतीची ओळखबाह्य जगाला करून द्यावी; असा मोलाचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयूषी सिंह यांनी युवकांना दिला.
नेहरू युवा केंद्र आणि केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्याद्वारे आयोजित १५ व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत ३० युवकांची तुकडी चंदीगडसाठी रवाना करतांना त्या बोलत होत्या.पुढे श्रीमती सिंह म्हणाल्या,आपल्या मनातील मागासलेपणाची भावना अयोग्य असून आपण कुठल्याही गोष्टीत मागे आहोत, असा न्यूनगंड बाळगू नये.त्याचप्रमाणे खरे शिक्षण हे पुस्तकापेक्षा बाह्य जगात जास्त मिळते. त्यामुळे मिळालेल्या प्रवासाच्या संधीचे सोने करावे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्प्यांचा उल्लेख करून त्यांनी युवांना मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाला जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे त्याचप्रमाणे CRPF १९२ बटालियन चे अधिकारी नरेंद्र कुमार हे उपस्थित होते.त्यांनी देखील युवकांना मार्गदर्शन केले.नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील एकूण २४० आदिवासी युवकांना पोलीस नेहरू युवा केंद्र¸गडचिरोली आणि CRPF ह्यांच्या माध्यमातून भारतातील विविध ९ मोठ्या शहरांमध्ये पाठवले जाणार आहे.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे,विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. देशातील विविध भागातून आलेल्या त्यांच्या समवयस्कांशी भावनिक संबंध विकसित करण्यात आणि त्यांचा स्वाभिमान वाढविण्यात मदत करण्यासाठी हा भारत सरकारचा महत्त्वाचा प्रयत्न आहे.कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे,पॅनल चर्चा,व्याख्यान सत्र,आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम,वक्तृत्व स्पर्धा,कौशल्य विकास,करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.