उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-नागरी सेवांमध्ये निवडीसाठी ओळख बदलून अपंगत्व प्रमाणपत्रात अनियमितता केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर आता IAS अधिकारी नाहीत.UPSC ने पूजा यांची निवड रद्द केली आहे. UPSC ने २०२३ बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध नागरी सेवा परीक्षेत ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा उपस्थित राहिल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता.
UPSC ने पूजा यांना नोटीस बजावली होती आणि निवड रद्द करण्याबाबत उत्तर मागितले होते. यूपीएससीने म्हटले होते की,पूजाविरुद्धच्या तपासात त्यांचे नाव,पालकांचे नाव,स्वाक्षरी, फोटो,ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलून यूपीएससीची परीक्षा दिल्याचे आढळून आले.दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजाविरुद्ध बनावटगिरी,फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.पूजावर पदाचा गैरवापर आणि प्रशिक्षणादरम्यान वाईट वर्तन केल्याचा आरोप होता.आधी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजाविरोधात तक्रार केली होती,त्यानंतर त्यांची वाशिमला बदली झाली होती.त्यानंतरच पूजावर ओळख लपवून ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला.१६ जुलै रोजी पूजाचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आणि त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये परत बोलावण्यात आले.तथापि,२३ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत त्या LBSNAA मध्ये पोहोचल्या नाहीत.
अपंगत्व प्रमाणपत्रात पूजा खेडकर यांचा पत्ता ‘प्लॉट नं.५३,देहू आळंदी रोड,तळवडे,पिंपरी चिंचवड,पुणे’ असा लिहिला होता.तर या पत्त्यावर घर नसून थर्मोव्हर्टा इंजिनिअरिंग कंपनी नावाचा कारखाना आहे.जप्त करण्यात आलेली पूजा यांची ऑडी या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती.
सरकारी नियमांनुसार,अपंगत्व प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे,परंतु पूजा यांच्या प्रमाणपत्रात रेशनकार्डचा वापर करण्यात आला.अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर पूजा यांची अनेक अपंगत्व प्रमाणपत्रे बाहेर आली आहेत.पूजा खेडकर यांनी २०१८ आणि २०२१ मध्ये अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलने UPSC कडे दिलेले २ अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते.
पूजा यांनी त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची पुष्टी करण्यासाठी दिल्लीत वैद्यकीय तपासणीसाठी अनेक भेटी घेतल्या होत्या,परंतु नंतर त्यांनी एका खासगी रुग्णालयात केलेला अहवाल यूपीएससीकडे सादर केला.पूजा खेडकर यांचे लोकोमीटर प्रमाणपत्र तयार करताना कोणतीही चूक झाली नसल्याचे यशवंत राव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.प्रमाणपत्रात पूजा यांना ७% लोकोमीटर अपंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.हे रुग्णालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका चालवते. फसवणूक आणि बनावटगिरीच्या प्रकरणात पूजा यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालय १ ऑगस्ट रोजी निर्णय देऊ शकते.आज,बुधवारी खेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्रकुमार जंगला यांनी निर्णय राखून ठेवला.अटक होण्याचा धोका असल्याचा दावा पूजा यांनी वकिलामार्फत केला होता.UPSC तर्फे हजर झालेल्या वकिलांनी अर्जाला विरोध केला आणि दावा केला की त्यांनी सिस्टमची फसवणूक केली आहे.पूजा यांनी कायदा आणि कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. तरीही त्यांनी कायद्याचा गैरवापर केला असण्याची शक्यता आहे.(साभार-दिव्य मराठी)