उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहरापासून काही अंतरावर आरमोरी मार्गे वन विभागाच्या जैव विविधता उद्यान(फॉरेस्ट गार्डन/पार्क)नजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत १४ वर्षीय तरुणी जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक-१ जून रोजी सकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घडली.शर्वरी पदमाकर बनकर, वय १४ वर्षे,रा.तुकुम वार्ड,देसाईगंज(वडसा) जि.गडचिरोली,असे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शर्वरी ही नेहमी प्रमाणे आज पहाटे घरून व्यायाम करण्याकरिता फिरायला निघाली होती.जात असतांना वाटेतच देसाईगंज-आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या जैव विविधता उद्यान (फॉरेस्ट गार्डन/पार्क) नजिक मुख्य डांबरीकरण मार्गावर सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिली.धडक देऊन डोक्यावरून वाहन गेल्याने त्यात तिचा जबडा बाहेर निघाला व डोक्याला जबर मार लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला.घटना स्थळावरून अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला.मात्र,आज सकाळी ५ ते ५.३० वाजेची घटना असल्याने कुणाच्याही लक्षात आली नाही.त्यामुळे अनेकजण संभ्रमात असल्याचे लक्षात येते.काही वेळानंतर सदरची घटना मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच,त्यांनी याबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती दिली.देसाईगंज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. घटनेचा तपास ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.