उद्रेक न्युज वृत्त :- रोजची रोजी-रोटी कमावून खाणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराने आर्थिक विवंचनेत टाकले आहे.अशातच मिळणारी सबसिडीही बंद झाली असल्याने गॅस खरेदी करावे की उदरनिर्वाह करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचा कल पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वाढलेला दिसून येतो आहे.
केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला.योजनेच्या वेळेस गॅस सिलेंडर ‘स्वस्तात मस्त’ म्हणून नागरिकांना भुरळ घातली गेली.मात्र हल्ली गॅस सिलिंडर १२०० रुपयांपर्यंत खरेदी करण्याची वेळ आल्याने गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा उज्ज्वला गॅस धारकांना चुलीवर परतावे लागले आहे.चुलीवरच्या स्वयंपाकामुळे ग्रामीण भागातील महिलांना श्वसनाचे,डोळ्याचे,फुफ्फुसाचे आजार व इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले तर वन्यप्राण्यांचा धोका आणि मोडी आणल्या तर अवैध वृक्षतोडीचा गुन्हा.यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशा पेचप्रसंगात ग्रामीण भागातील जनता अडकली आहे.असे वृत्त काही दिवसांपूर्वी उद्रेक न्युज ने प्रकाशित केले होते.अशातच आता मोठी बातमी समोर आली असून उज्जवला योजनेअंर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना सबसिडी देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांच्या नवीन अधिसूचने नंतर उज्ज्वला योजनेच्या ९.५९ कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी मिळणार आहे.तसेच सरकारने वर्षभरात १२ सिलिंडर भरण्यासही परवानगी दिली आहे.म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाने एका आर्थिक वर्षात १२ स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर २०० रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मंजूर केली आहे.
सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.दरम्यान मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंगुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपन्या या २२ मे २०२२ पासून अनुदान देत आहेत.अनुदान मिळत असल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.