- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली.त्या माहितीच्या आधारे वनविभागाने तात्काळ कारवाई करीत सहा आरोपींना अटक केली.आरोपींकडून तीन दुचाक्या,६ मोबाईल व दोन मोठे कासव जप्त करण्यात आले होते. सदरची टोळी अनेक दिवसांपासून कासवाची शिकार करीत असल्याचे उघड झाले.विशेष म्हणजे,१२ एप्रिल रोजी हरंबा येथील अज्ञात व्यक्तीचा कासव तस्करांसोबत सौदा झालेला होता.अंधश्रध्देतून कासवावर उपाययोजना करून जादुटोना करण्याच्या प्रयत्नात असतांना वनविभागाने कारवाई केली.कारवाईमध्ये आरोपी गंगाधर बुरांडे रा.जामखुर्द,मोरेश्वर देवताळे रा.जामखुर्द,ओमदेव शिंदे रा.गणपूर,हेमचंद शेंडे रा. गणपुर,धवल बेलादी रा.गणपूर,राजेंद्र दिवसे रा.चक नवेगाव यांना अटक करून सर्व आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४९,५० व ५१ नुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला होता.अश्यातच आरोपींचे मोबाईल तपासले असता वनाधिकाऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे.मोबाइलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळलेले असून स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण, घुबड आणि कासवांचे फोटो,तसेच अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो,त्यांच्या जन्मकुंडल्या आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही हाती लागले आहेत.काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.विशेष म्हणजे, आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता; मात्र ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले.सध्या सर्व सहा आरोपी वनकोठडीत असून, मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक आणि महाराज अद्याप फरार आहेत.हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने लवकरच हा तपास पोलिस विभागाकडे वर्ग केला जाणार आहे.या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून भोंदूगिरीच्या या विळख्यात अजून किती महिला अडकल्या आहेत,याची धक्कादायक माहिती तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे.या प्रकरणातील मांत्रिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असून या टोळीचे जाळे चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर, पोंभुर्णा तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या ग्रामीण भागांत पसरलेले आहे. दरम्यान या प्रकरणात काल गुरुवारी आणखी १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.या रॅकेटमध्ये जवळपास ५० मध्यस्थ असून ते ‘शिकार’ शोधायचे. ‘शिकार’ महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांचे व्हिडिओ मध्यस्थ मुख्य मांत्रिकाकडे पाठवायचा.या वर्तुळात मांत्रिकाला ‘टेस्टर’ म्हटले जात होते.एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी ‘योग्य’ आहे की नाही,हे हा टेस्टर ठरवायचा.त्यानंतर निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमीत रात्री अघोरी विधी पार पाडला जायचा.पैशाचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवले जायचे.सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यासंदर्भात बोलतांना म्हणाले,कासव तस्करीतील आरोपींच्या मोबाइलमध्ये अघोरी पूजेचे व्हिडिओ मिळाले.हे प्रकरण गंभीर आहे.या पूजेत मुली आणि विधवा महिलांचा वापर केला जात होता.सदरच्या प्रकारावरून टोळीचे जाळे दूरवर पसरले असल्याने आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

