उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- कुरखेडा तालुक्यातील पुराडा नजिकच्या जंगल परिसरात छोट्या-छोट्या इयत्ता ३ री ते ४ थी तील शालेय विद्यार्थ्यांचा तेंदूपाने खुट कटाईसाठी वापर केला जात असल्याची घटना काल २४ मार्च २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.सदर कामावर बाल कामगार ठेऊन कमी पैशात जास्त काम करून घेता यावे; यासाठी लहान बालकांचा वापर करून खुट कटाईचे कामे करवून घेणाऱ्या पुराडा ग्रामपंचायतीतील ग्रामकोष समिती व कंत्राटदारावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी तेंदुपत्ता संकलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गावातील नागरिकांना रोजगार पुरविल्या जातो.अशातच मार्च महिन्याच्या सुरुवातीला वा अखेर तेंदूपाने खुट कटाईची कामे गावातील वा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून निर्धारित मजुरीच्या माध्यमातून करवून घेतली जातात.काही गावांचा पेसा कायद्या अंतर्गत समावेश असल्याने अशी गावे ग्रामकोष समिती नेमून कंत्राटदारांशी कंत्राट करून तेंदुपाने विक्री करीत असतात.तेंदूपाने खुट कटाई करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे चांगल्या प्रतीची तेंदूपाने पुढील दोन महिन्यात संकलित व्हावे असा आहे.
अशातच काल २४ मार्च २०२३ रोजी दुपारच्या सुमारास पुराडा वरून ५०० मीटर अंतरावर कोरची मार्गे मुख्य मार्गाच्या लगत असलेल्या जंगल परिसरात बाल कामगार तेंदूपाने खुट कटाई करतांना आढळून आली.पुराडा हे गाव पेसा कायद्या अंतर्गत मोडते.त्यानुसार पुरांडा ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामकोष समिती तयार करून गावातील अध्यक्षाची निवड करण्यात आली व सदर समितीचे सचिव हे ग्रामपंचायतीचेच ग्रामसेवक असतात.यांचे काम तेंदुपत्ता घेऊन जाणाऱ्या कंत्राटदारावर देखरेख ठेवणे व जेवढी रॉयल्टी काढण्यात आली तेवढेच संकलन करण्यात आले वा त्यापेक्षा अधिक चे तेंदुपत्ता काढण्यात आले किंवा नाही तसेच इतर कामे करवून घेत असतांना बाल कामगार तर नाही ना? या सर्व प्रकरणांवर आळा घालणे आवश्यक आहे.मात्र पुराडा ग्रामकोष समिती यांचा वेगळाच प्रकार पहावयास मिळतो आहे.कंत्राटदार व ग्रामकोष समितीने १२ वर्षाखालील बालकांच्या हातात कुऱ्हाडी घेऊन काम करवून घेत असल्याचे आढळून आले आहे.जाणकारांच्या मते,मोठे मजुर कामावर ठेवल्यास त्यांना २०० ते २५० रुपये मजूरी द्यावी लागते तर लहान बालकांना ३० ते ४० रुपये देऊन त्यातील उर्वरित रक्कम आपल्या घशात टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
तेंदूपाने खुट कटाई कामावर १४ वर्षांखालील बालक कामावर असल्याने अशी बालके कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे.शासकीय नियमानुसार अशांना बाल कामगार समजले जाते.डिसेंबर २०१६ मध्ये शासनाने बाल कामगारांचे वय १४ वर्षांऐवजी १८ वर्षे केले.त्यामुळे आता १८ वर्षांखालील मुलेही बाल कामगार समजली जातात.असे असतांना आपल्यावर कोणतीच कारवाई होत नाही तसेच कमी पैशात जास्त काम करून घेता येते म्हणून कंत्राटदार वा इतर याबाबत वाच्यता करीत नाही.त्यामुळे साहजिकच काम करणाऱ्या बाल मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली जात आहे.
अशातच पुराडा जंगल परिसरात तेंदूपाने खुट कटाईसाठी बाल कामगारांचा वापर करणाऱ्या ग्राम कोष समिती व कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली जात आहे.सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.