उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शिवनाथ गेडाम त्यांची पत्नी व एका नातेवाइकांना नोकरी लावून देतो म्हणून त्यांच्याकडून नोकरीच्या नावावर ११ लाख ५० हजार रुपये तिघांनी घेतले.त्यांना खोटे मुलाखत पत्र देऊन त्यांची मुलाखतही घेण्यात आली.त्यांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेऊन त्यांची फसवणूक केली.
वर्धाच्या ॲम्युनिषन डेपोत नोकरी लाऊन देण्याचे आमिष देऊन ११ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या तिघांवर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात तिरोडाच्या पारसनगरी येथील शिवनाथ प्रभुदास गेडाम (४३) यांनी पोलिसात तक्रार केली.
आरोपी महेश गायधने (३८, रा. नवेझरी), सचिन डोंगरे (३८, रा. तिरोडा) व बाबूलाल मडावी (४५, रा. देवरी) या तिघांनी ११ ऑक्टोबर २०१७ ते १३ नोव्हेंबर २०१७ या काळात नोकरी लाऊन देण्याच्या नावावर ११ लाख ५० हजार रुपये घेतले.परिणामी आपली फसवणूक झाल्या प्रकरणी शिवनाथ गेडाम यांनी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता तिरोडा पोलिसात तक्रार केली.तिरोडा पोलिसांनी तीन आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हनवते करीत आहेत.