उद्रेक न्युज वृत्त
भंडारा:- तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या आधारभूत धान खरेदी केंद्रात चार कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.जिल्हा पणन अधिकारी भारात पाटील यांच्या तक्रारीवरून संस्थेच्या अध्यक्षासह १२ जणांवर गोबरवाही ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अनुप शरद बोरकर,संचालक टिकाराम अनंताराम वासनिक आणि ग्रेडर विजय तेजराम वाघाडे यांना अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने तिघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने जामिन नामंजूर करत त्यांची न्यायालयीन कोठडीत भंडारा कारागृहात रवानगी केली.तर ठाकचंद आत्माराम मुंगुसमारे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला होता.आता आठ आरोपी पसार असून त्यात उपाध्यक्ष बळीराम प्रेमलाल पुष्पतोडे,संचालक तिलकराम गोविंदा कापगते,अनिल शामराव पुष्पतोडे,शालिकराम गौपाले, मुलचंद प्रभुदास राऊत, प्रमिलाबाई डुलिचंद पुष्पतोडे, रेणुकाबाई चेतन गौपाले,बी.एस. रहांगडाले यांचा समावेश आहे.