उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :-तालुक्याच्या तुलनेत इतर तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेची कामे जोमाने सुरू आहेत. सध्या स्थितीत देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये बऱ्याच प्रमाणावर यंत्रणा स्तर व ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजूर वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.कित्येक दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असणारा मजूर वर्ग हाताला काम नसल्याने घरी बसून आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे.हल्ली रब्बी हंगाम सुरु असून शेतीची कामे तोंडावर आली असल्याने रोजगार हमीची कामे सुरू केली गेली तर मशागत करण्याकरिता काही प्रमाणात हातभार लागणार असल्याचे गावातील मजूर वर्गांचे म्हणणे आहे.पूर्वी यंत्रणा स्तरावरील रोजगार हमी योजनेची कामे भरपूर प्रमाणावर केली जायची मात्र सध्या स्थितीत यंत्रणा स्तराला रोजगार हमीची कामे करण्यास ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.रोजगार हमी योजने अंतर्गत एका कुटुंबाला १०० दिवस रोजगार पूरविण्याची हमी व तशी कायद्यामध्ये तरतूद केली गेली आहे.मात्र काही जणांच्या ढिसाळ कारभारामुळे “रोजगाराची हमी, कामाची कमी”असल्याचे दिसून येत आहे.पाहिजे त्या प्रमाणात कामे उपलब्ध केली जात नाही.कामाची कमी असे होऊ नये व गावातील मजूर वर्गांच्या कामाची निकड लक्षात घेता रोजगार हमीची कामे तात्काळ सुरू करण्यात यावी.अशी मागणी देसाईगंज तालुक्यातील मजूर वर्ग व गावातील नागरिकांकडून केली जात आहे.