उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक गेली दीड ते दोन वर्षांपासून रॉशन दुकानातील अन्नधान्य मिळण्याच्या लाभापासून वंचित असून अनेक शिधापत्रिकाधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच असल्याने नवीन शिधापत्रिकाधारकातील कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता व इतर कामाकरिता अनेक सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांनी देसाईगंज तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी वेगळ्या नवीन शिधापत्रिका काढून घेतल्या आहेत.नवीन शिधापत्रिका काढून काही शिधापत्रिकाधारकांना जवजवळ दीड ते दोन वर्ष लोटूनही रॉशन दुकानातील अन्नधान्याचा लाभ मिळत नसल्याने अजून किती दिवस अन्नधान्यासाठी वाट बघावी लागणार? असा प्रश्न अनेक नवीन शिधापत्रिकाधारकांना पडलेला आहे.काही शिधापत्रिकाधारकांना कार्डाचे आर.सी.क्रमांक मिळूनही लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.दगदगीच्या जीवनशैलीमध्ये दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे व पोटाची खळगी भरणारे अनेक कुटुंबे आहेत.
काही शिधापत्रिकाधारक भूमिहीन असून रोजगाराच्या संधी शोधून संसाराचा गाडा हाकण्याच्या तयारीत असून रोजगार मिळेनासा झाला आहे. अशातच अन्नधान्य मिळत नसेल तर काय करावे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही कुटुंबांना कार्डचे आर.सी.क्रमांकही मिळाले.मात्र कितीतरी वर्षांपासून रॉशन दुकानातून अन्नधान्य मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची पाळी येणार की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन स्तरावरून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ग्रामीण भागात ४५ हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी तर शहरी भागात १ लाख ५० हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी निवड करून प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ दिला जातो.मात्र दीड ते दोन वर्ष लोटूनही अन्नधान्याचा लाभ मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे?असा विचार सर्वसामान्यांच्या मनात घर करून सोडत आहे.