- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-नुकतेच १ एप्रिल २०२५ रोजी गौण खनिज उत्खनन प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड व कवडजई येथील तलाठी सचिन पुकळे यांनी तब्बल २ लाख २० हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता ४ लाख २० हजार रुपयांची लाच घेतांना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यरत कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे,वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावार व कंत्राटी परिचर मतीन शेख यांना काल,गुरुवार १० एप्रिल रोजी चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याने जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात एकच खळबळ माजली आहे.
प्रकरणातील तक्रारकर्ते हे कंत्राटदार आहेत.चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती येथील कंत्राटदार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील कामे केली होती.त्यांनी जिवती आणि राजुरा तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणी पुरवठा संबंधी कामे करून १० गावातील कामांचे देयक(बील)चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी सादर केले होते.त्यापैकी ५ गावातील कामांचे ४३ लक्ष रुपयांचे बिले कंत्राटदार यांना मिळाले.उर्वरित बिले मंजूर करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे यांनी ४ लक्ष रुपयांची लाच संबंधित कंत्राटदाराला मागितली.
लाचेची रक्कम वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावार यांच्याकडे देण्यास सांगितले.वरिष्ठ अधिकाऱ्याला ४ लाख रुपये मिळणार हि बाब गुंडावार यांना समजताच त्यांनी सुद्धा स्वतःसाठी २० हजार रुपयांची लाच मागितली.दोन्ही अधिकाऱ्यांचे एकूण ४ लाख २० हजार रुपये द्यावे लागणार असे समजताच कंत्राटदार यांनी चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली.तक्रार प्राप्त झाल्यावर ७ एप्रिल ते ९ एप्रिल रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली.त्यानुसार काल,गुरुवार १० एप्रिल रोजी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता चंद्रपूर जिल्हा परिषद परिसरात वरिष्ठ सहाय्यक सुशील गुंडावार यांनी ४ लाख २० हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारत,लाचेच्या रकमेतील २० हजार रुपये स्वतःसाठी काढले आणि उर्वरित ४ लक्ष रुपये परिचर मतीन शेख यांच्याकडे देत साहेबांच्या घरी नेऊन द्या,असे सांगितले.शेख यांनी सदर रक्कम कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्या घरी नेऊन दिली असता,त्यावेळी लाचलुचपत विभागाने हर्ष बोहरे,सुशील गुंडावार व मतीन शेख यांना रंगेहाथ अटक केली. आज,शुक्रवार ११ एप्रिल रोजी तिघांविरोधात चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी शिवराज नेवारे,नरेशकुमार नन्नावरे,रोशन चांदेकर,अमोल सिडाम,प्रवीण ताडाम,वैभव गाडगे,पुष्पा काचोळे,सतीश सिडाम व संदीप कौरासे यांनी केली.
- Advertisement -