उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कुरखेडा(गडचिरोली) :-आजच्या घडीला व यापूर्वीही पत्रकार बंधू सर्वसामान्य जनतेची कळवळ लक्षात घेऊन अनेक प्रश्नांची बातम्यांच्या माध्यमातून छाप पाडून पुढाकार घेत असतात.कधी शासनाच्या संपत्तीची लूट असो वा कधी कुणावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडणे वा इतर अशी अनेक कामे पत्रकार बंधू करतांना दिसून येतात.मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना उघडे पाडलेले पितळ नकोसे वाटत असतात.असाच प्रकार कुरखेडा तालुक्यात दिसून येतो.
कुरखेडा तालुक्यात शासनाच्या गौण खनिजांची अवैधरीत्या चोरी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याने कुरखेडा येथील स्थानिक पत्रकारांनी वारंवार अवैध रेती व इतर तस्करीवर आळा घातला जावा; याकरिता दैनिक वृत्तपत्र व इतर ऑनलाईन न्युज पोर्टलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित करून अवैध धंद्यांवर काही काळ तरी लगाम लागावे; यासाठी वेळोवेळी प्रशासनास जाग आणून दिली.मात्र काही मुजोर तस्करांनी कुणालाही न जुमानता आपल्याच मनाचा कारभार करून ‘आमचे वाकडे कोण करणार? या संभ्रमात जाऊन ‘आम्ही करू ती पूर्वदिशा’ असे वागून चक्क लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांनाच कुंभीटोला येथील देवानंद रेवनाथ नाकाडे याने अश्लील व अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ केली असल्याने काल १३ जून २०२३ रोजी स्थानिक पत्रकारांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानुसार पत्रकारांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी काल सायंकाळी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे देवानंद रेवनाथ नाकाडे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम २९४ व ५०६ गुन्हा नोंद करण्यात आला असून कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनीरीक्षक भांडेकर पुढील तपास करीत आहेत.