उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील कुसुंबी गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश आयोगाने दिले होते.मात्र जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाही.त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या.त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने महासंचालकांना वॉरंट अरेस्ट ऑफ विटनेस पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना २ मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश आयोगाने दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी आदिवासींच्या जमिनीवरील माणिकगड सिमेंट कंपनीच्या अतिक्रमणाच्या मुद्यावरुन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगात धाव घेतली होती.त्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना १६ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते.विनय गौडा यापूर्वी सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी होते.पाच महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपुरात त्यांची नियुक्ती झाली आहे.पाच महिन्याच्या काळात त्यांची कारकीर्द उत्तम राहिली आहे.