उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील विसापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एपीजे अब्दुल कलाम गार्डन आहे.याठिकाणी सध्या प्रेमीयुगुलांची वर्दळ वाढल्याने हे ठिकाण लव्हर्स पॉइंट म्हणून ओळखले जात आहे. तसेच एपीजे कलाम गार्डनमधील हिरवळीच्या मोकळ्या जागेतही प्रेमीयुगुलांनीच ठिय्या मांडल्याने हे ठिकाण सध्या प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे.
काही वर्षांपूर्वी विसापूर वळणावर वृक्षारोपण करण्यात आले. येथील झाडे आता मोठी झाडे झाली आहेत. त्यामुळे येथे सुशोभीकरणासोबतच मोठ्या प्रमाणातवर हिरवळ असल्याने आल्हाददायी वातावरण असते. त्यामुळे अनेकवेळा दुपारी दुचाकीवरून जाणारी अनेक कुटुंबे काही वेळ येथे विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला निघतात.मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे काही तरुण- तरुणींची घोळका पाहायला मिळत आहेत.या लोकांचे कृत्य पाहून अनेकवेळा इतर नागरिकांना लाजीरवाणे झाल्यासारखे वाटते.अनेकदा तर अश्लील चाळे करतानाही प्रेमीयुगुल दिसून येतात.येथे वृक्षारोपण करून परिसराचे सुशोभीकरण करून शाळकरी मुलांकरिता सहलीसाठी एक उत्तम स्थळ येथे व्हावे, हा मुख्य उद्देश होता.
मात्र,सध्या येथे वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. अंधार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुचाकीवर बसलेले प्रेमीयुगुल कधी- कधी एकाच दुचाकीवर एकमेकांचा हात धरून बसलेले दिसतात.अशा परिस्थितीत येथे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.