उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा येथे अवैधरीत्या शासनाच्या गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर चोरी होऊन शासनास करोडो रुपयांचा चुना लावला जात असूनही गावातील तलाठ्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने कोंढाळा येथील तलाठ्यास निलंबित करून कोंढाळा येथे नवीन व सक्षम तलाठयाची नियुक्त करण्यात यावी; अशी मागणी आज २७ फेब्रुवारी २०२३ रोजी देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसिलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याकडे करण्यात आली आहे.
देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजा-कोंढाळा या ठिकाणी शासनाच्या खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीची व इतर गौण खनिजांची चोरी केली जात आहे.जवळपास करोडो रूपयांची अवैधरित्या रेती कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील पिंपळगाव घाट, मेंढा घाट व इतर घाटातुन अवैध उपसा करण्यात आली आहे.हल्ली पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातुन मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा करण्यात येत असुनही कोंढाळा साजातील तलाठ्याचा अवैध धंद्यांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने व तलाठी गावात वास्तव्यास राहत नसल्याने अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नाही.शासनाचा करोडो रूपयांचा महसुल बुडीत असल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याचे लक्षात येत आहे.त्यामुळे कोंढाळा साजातील तलाठी सक्षम नसल्याचे दिसुन येत असुन सदर तलाठ्याला निलंबित करून कोंढाळा येथे नवीन व सक्षम तलाठयाची नियुक्त करण्यात यावी.अशी मागणी देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.
सदर निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके,देसाईगंज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे,तालुका सरचिटणीस तथा कोंढाळा शाखाध्यक्ष नामदेव वसाके,सचिव सत्यवान रामटेके,अविनाश राघोर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.