उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजांची छुप्या पद्धतीने व खुलेआम लूटमार करून शासनास लाखोंचा चुना लावल्या जात असूनही कुरखेडा महसूल प्रशासन एवढे गाढ झोपेत कसे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात असल्याने कुठेतरी भले मोठे पाणी मुरत असावे; असे तर्क-वीतर्कांना उधाण आले आहे.
सध्या स्थितीत सगळीकडेच रेती घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असल्याने अवैधरीत्या रेती चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहेत.अशातच कुरखेडा तालुक्यातील सती नदीतून अवैधरीत्या रेती चोरीचा सपाटा रेती तस्करांनी चालवला असल्याने सर्वांचे खिसे गरम करून ‘माल सुतावो’ अशी भूमिका तर घेतली जात नसावी ना? अशी शंका बळावली जात आहे. तालुक्यातील आंधळी-नवरगाव,खरमतटोला, कुंभीटोला व इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे.रेती चोरीसाठी सती नदी तस्करांसाठी वरदान ठरली आहे.रात्रीच्या अंधारात व दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर व इतर साधनांद्वारे मोठ्या प्रमाणावर धूमधडाक्यात रेतीचा अवैध उपसा करून शासनाच्या महसुलाचे सोक्ष-मोक्ष केले जात आहे.
रेती बरोबरच काही कंत्राटदार मुरुमाची रॉयल्टी १०० ब्रास तर उत्खनन ३०० ब्रास व त्याही पलीकडे उत्खनन करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारीत आहेत.मुरुमाच्या वाहतूक परवाना केवळ देखाव्या करीता वापरल्या जात असल्याने वाहतूक परवाना एक तर प्रत्यक्ष वाहतूक अनेक असे होत आहे.त्यामुळे ‘कंत्राटदारांची चांदी तर महसूल विभागाची वांदी’ होऊनही खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत चुप्पी साधून गमती-जमतीचा खेळ खेळला जात असल्याचे जनता जनार्दनातून हळूच दबक्या आवाजात बोलले जाते आहे.
अवैध गौण खनिजांची लूटमार होऊ देण्यास जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने यावर आळा बसणार की नाही; याकडे कुरखेडा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या दिसून येत आहेत.