उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- ‘बोले तैसा चाले; त्याची वंदावी पाऊले’ अशा संतांच्या म्हणी प्रमाणे सत्यवान रामटेके यांनी प्रत्यक्षात कृती करून दाखवूनही समोरील अधिकारी व कर्मचारी यांना अजूनही चोलर शाहीच वाटत असल्याचा हल्ली प्रकार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी निदर्शनास येऊ लागला आहे.
सत्यवान रामटेके यांनी दिनांक-२० एप्रिल २०२३ रोजी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यासंबंधाने विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांना तक्रार दाखल केली होती.तक्रारीत येत्या सात दिवसांत कुठल्याही प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार कारवाई वा चौकशी न झाल्याने २ मे २०२३ रोजी रामटेके यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता.उपोषण सुरू असतांनाच त्याच दिवशी लिखित मागण्या मंजूर झाल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आला. लिखित मागण्यामध्ये ९ मे २०२३ रोजी सदर प्रकरणी चौकशी समिती गठीत करून रामटेके यांना सदर समितीचे सदस्य ठेवण्यात आले होते.चौकशी समिती गठीत तर करण्यात आली.मात्र ज्या विभागाची तक्रार करण्यात आली होती; त्याच विभागाचे सर्व समितीमध्ये ठेवण्यात आल्याने १७ मे २०२३ रोजी आक्षेप घेण्यात आला.
महत्वाचे म्हणजे गठीत करण्यात आलेली समिती; ही केवळ चार भिंतींमध्येच थाथुर-मातुर चौकशी करीत असल्याचा आरोप रामटेके यांनी केल्याने गठित समिती रद्द करण्यात आली.त्यानुसार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांना त्याच दिवशी पत्रानिशी कळविण्यात आले होते. पत्रानिशी कळविण्यात येऊनही अजून पावेतो चौकशी समिती वा चौकशीचा थांगपत्ताच लागेनास झाला आहे.त्यामुळे येत्या तीन दिवसांत नव्याने चौकशी समिती गठीत न झाल्यास व कुठल्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत न दिसल्यास ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या व नव्याने करण्यात आलेल्या लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवरील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून मुख्य प्रधान सचिव पुणे,अप्पर प्रधान सचिव पुणे व वनसंरक्षक नागपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठांना पत्ररुपी तक्रार तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.