उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला असून यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या ८ कार्यकर्त्यांवर मारहाण,शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.तर आमदार भांगडिया यांच्या तक्रारीवरून फिर्यादी साईनाथ बुटके यांच्यावरही शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.साईनाथ बुटके या काँग्रेस समर्थकाने त्याच्या व्हाट्सएप स्टेटसवर आमदार बंटी भांगडीया यांची आणि त्यांच्या परिवाराची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केला होता.त्यामुळे संतापलेल्या बंटी भांगडीया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री साईनाथ बुटके यांना घरी जाऊन मारहाण केल्याचा आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.दरम्यान, आमदारांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या साईनाथ बुटके यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता.यामुळे चिमूर येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.