उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-भूमी अभिलेख विभागाने आईचे नाव सातबारावर लावण्याचा निर्णय घेतला असून,ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे.यासाठी राज्य शासन ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे.अर्थात,आईचे नाव सातबारावर दाखल करण्यापूर्वी संबंधित कुटुंबातील आईचे नाव हेच आहे का,याची खातरजमा करण्यासाठी तलाठी संपूर्ण कुटुंबाला बोलावू शकतो.तसेच आईचे नाव तपासण्यासाठी तलाठ्यांना कसरत करावी लागणार आहे.
राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.त्याच अनुषंगाने एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे.त्यासंदर्भात आता संगणक प्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणीवेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे.सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करता येईल; परंतु त्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे.