उद्रेक न्युज वृत्त :- गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकार दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देणार आहे. यापूर्वी त्यात रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल या चार वस्तूंचा समावेश होता. त्यात आता पोहे व मैदा या आणखी दोन वस्तूंची भर पडली आहे. शंभर रुपयांतच या ६ वस्तू मिळतील. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोन वस्तूंचा ‘बोनस’ देताना सरकारने एक चलाखी केली आहे. पूर्वी साखर, रवा व चणाडाळ प्रत्येकी एक किलो व तेलही एक लिटर दिले जात होते. आता सरकारने पूर्वीच्या २ वस्तूंच्या वजनात कपात केली आहे. साखर पूर्वीप्रमाणे एक किलो व तेल एक लिटर मिळणार आहेच. पण रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे मात्र फक्त अर्धा किलोच मिळणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील जिल्हे आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील १ कोटी ६६ लाख लाभार्थींना आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित केला जाईल. यासाठी ५३० कोटी १९ लाख मंजूर केले आहेत.