उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :- देसाईगंज मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावापासून रई मार्गे दोन किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून दररोज अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात आहे.काही दिवसांपूर्वीच रेती चोरांनी नवीन चौथ्या रेती घाटाचा शोध लावला असल्याचे वृत्त प्रकाशित होताच महसूल विभाग खळबळून जागे होऊन त्यावर खड्डा मारून काही दिवस रेती तस्करीवर आळा घातला होता.मात्र अशातच रेती तस्करांनी पुन्हा आपला कल पिंपळगाव घाटाकडे वळविला असून पाणी असलेल्या नदी काठारील दुसरीकडे पाणी वळवून अवैधरित्या रेतीचा उपसा अंदाजे २०० ब्रासच्या वर केला असून पुन्हा रेती चोरीचा धुमाकूळ घातला असल्याने महसूल व वन विभाग एवढे गाढ झोपेत कसे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून उजवीकडे गेल्यास दोन किलोमीटर अंतरावर अवैध रेतीचा उपसा केला जातो आहे.रेती चोरीसाठी रेती तस्करांना रात्रोचा काळोख फायदेशीर असल्याचे मानले जात आहे.अवैध रेतीचा उपसा करण्यास अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवण्याकरिता ३०० रुपये रोजी ठरविलेली तरुण मुलांचा वापर करतांना दिसून येत आहेत.हल्ली रेती तस्करांनी शक्कल लढवून गावातून रेती भरलेली ट्रॅक्टर वा इतर साधने टाकत नसून साई मंदिरा कडील पांदण रस्त्यावरून रात्रोच्या काळोखात खडकी धोडीनाल्या जवळून मुख्य मार्गे रेती विक्रीचा सपाटा लावला आहे.
एका ब्रास रेतीसाठी ३ ते ५ हजार रुपयांची रेती विक्री होत असल्याने झटपट पैसा व लवकर श्रीमंतीच्या नादात तरुणाई रेती तस्करीकडे वळलेली दिसून येते.रेती चोरी करण्यासाठी सुट्टीचे दिवस सुगीचे दिवस मानून नारळ फोडला जातो आहे.गावात कर्मचारी वर्ग वास्तव्यास राहत नसल्यानेच अवैध गौण खनिजाची चोरी करण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.यापूर्वी एवढ्या चोऱ्या पहावयास मिळत नव्हत्या; मात्र हल्ली गौण खनिजांच्या अफाट चोऱ्या होत्तांना दिसून येत असल्याने पाणी कुठेतरी मुरत असावे.अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गौण खनिजांच्या गावातील होणाऱ्या चोऱ्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोंढाळा शाखा पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदन सादर करून व गावात सक्षम तलाठ्याची मागणी करण्यात येणार असल्याचे राकाँचे देसाईगंज तालुका सरचिटणीस तथा कोंढाळा शाखाध्यक्ष नामदेव वसाके यांनी म्हटले आहे.

